बदलापूर घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्या प्रहारच्या रणरागिणी
यावलला रास्तारोको आंदोलनाने चक्काजाम, महिला, पुरुष झाले आक्रमक
यावल, दि.२१ ऑगस्ट – बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, दोषींवर कार्यवाही करावी, अशा महिला व मुलींच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महिला जिल्हाध्यक्ष ॲड.नंदिनी यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दि.२१ रोजी यावल येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
बदलापूर घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून त्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज यावल येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी झालीच पाहिजे, नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे, महिला, मुलींची सुरक्षा करणार कोण?, सरकार करते काय, खाली डोके वरती पाय अशा घोषणा देत आंदोलकांनी रास्तारोको केला. टी पॉइंट चौकात ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
*पोलीस प्रशासनाला दिले निवेदन*
आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन दिले असून त्यात आंदोलकांवरील गुन्हे त्वरीत मागे घ्यावे, अत्याचार करणाऱ्या नराधमांसाठी कठोर कायदा करणे, बदलापूर घटनेची सखोल चौकशी करणे, शाळा प्रशासन, पोलीस आणि संबंधित दोषींवर लवकरात कारवाई करावी, सतीसावित्री, विशाखा समितीची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, शाळा, महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षक असावे अशी मागणी करण्यात आली आहे.
*आंदोलनात यांचा होता सहभाग*
रास्तारोको आंदोलनात प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह हर्षा चौधरी, ॲड.नंदिनी चौधरी, आरती काठोके, शैला माळी, रेखा पाटील, शोभा माळी, आशाबाई कोळी, मीराबाई तेली, सविता पाटील, आलिशानबी शेख, हमीदाबी युनूस, मिसबाह सादब, संगीता बडगुजर, माजी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, धीरज चौधरी, नंदू सोनवणे, राकेश भंगाळे, खेमचंद कोळी, दिलीप वाणी, सचिन झाल्टे, भिका टकारी, गोकुळ कोळी, मनोज चौधरी, सागर चौधरी, गणेश जोशी, करीम मनियार, आलीम शेख, परेश नाईक, गणेश कोलते, नरेंद्र माळी, शिवाजी पवार, आसिफ शेख आदींसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
*यावलचा टी पॉइंट झाला जाम*
प्रहारच्या आंदोलनाने यावलच्या टी पॉइंटवर आंदोलकांची मोठी गर्दी जमली होती. सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनाने रस्त्याच्या तिन्ही बाजूला वाहनांची भली मोठी रांग लागली होती. यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या पथकाने आंदोलनानंतर लागलीच वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करुन वाहन चालकांना वाट मोकळी करुन दिली.
*चौधरी परिवार उतरला रस्त्यावर*
बदलापूर येथील अत्याचाराच्या निषेधार्थ आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पुकारण्यात आलेल्या आंदोलनात चौधरी परिवार रस्त्यावर उतरून आक्रमक झाला. आंदोलनात अनिल छबिलदास चौधरी, मुलगी हर्षा चौधरी, ॲड.नंदिनी चौधरी, भाची आरती काठोके, मुलगा धीरज चौधरी, मनीष चौधरी यांच्यासह इतर नातेवाईक आंदोलनात सहभागी झाले होते.